हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक   

सिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे हेरगिरीच्या संशयावरून लष्कराने एका पर्यटकाला शुक्रवारी अटक केली. लष्कर प्रशिक्षण केंद्राबाहेर तैनात असलेल्या कर्मचार्‍यांकडून माहिती गोळा करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चौकशीनंतर लष्कराने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिस चौकशी दरम्यान, या तरुणाने पाकिस्तान आणि चीनसह ६० देशांमध्ये प्रवास केल्याचे तपासात उघड झाले. त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व देखील आहे. त्याचे वडील सैन्यातून निवृत्त झाले आहेत. तो ज्या हॉटेलमध्ये राहत होता त्याचीही पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे.
 
शत्रू देशासाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली आतापर्यंत हरियाणा, पंजाब आणि हिमाचलमध्ये अनेक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये हरियाणाची ज्योती मल्होत्रा हिचे नाव आहे. सध्या ती १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. दोनच दिवसांपूर्वी हिमाचल पोलिसांनी कांगडा येथे एका तरुणाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक केली होती. या तरुणावर पाकिस्तानात बसलेल्या एजंटना भारताची संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप आहे.
 
वडील सैन्यातून निवृत्त
 
लष्कराने त्या तरुणाला संशयावरून पकडले आणि त्याची सखोल चौकशी  केली.त्यानंतर त्याला सिमला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एसपी सिमला यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरुणाचे नाव केबिन जॉन ट्रेस्लर आहे. तो प्रतीक स्टाइलम, सेक्टर-४५ नोएडा, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश येथे राहतो. त्याचे वडील भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी पाकिस्तानसह ६० देशांमध्ये प्रवास केला आहे. एसपी शिमला गौरव सिंह सांगितले की, त्या तरुणाने केबिन झोन, पाकिस्तान आणि चीनसह ६० देशांना ही भेट दिली होती. त्याचा पाकिस्तान प्रवासाचा इतिहास उघड झाल्यानंतरच लष्कराला त्याच्याबद्दल अधिक संशय आला होता. तो बुधवारपासून शिमला येथील हॉटेलमध्ये राहत होता. पोलिसांनी त्याच्या खोलीचीही झडती घेतली आहे.
 
सैन्य प्रशिक्षण केंद्राबाहेर फिरत होता
 
एसपी शिमला गौरव सिंह यांनी सांगितले की, तो शुक्रवारी दुपारी शिमला येथील सैन्य प्रशिक्षण केंद्राबाहेर फिरत होता. तो आर-ट्रॅकच्या बाहेर ड्युटीवर असलेल्या सैनिकांना विचारू लागला की तिथे कोणते अधिकारी बसतात. यामुळे लष्कराच्या जवानांना त्या तरुणावर संशय आला आणि त्याला अटक केली.

Related Articles